Ticker

6/recent/ticker-posts

"ओमराजे राजकारणातील कोहिनूरचा हिरा" खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची भावनिक पोस्ट

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत आहे.


नांदगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये ओमराजे निंबाळकर यांना “सध्याच्या राजकारणातील कोहिनूर” अशी उपमा देत त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “नव्या युगातील राजकारणाबद्दल सामान्य जनतेत सकारात्मक भावना कमी होताना दिसतात. मात्र या सगळ्या वातावरणात दिलासा देणारे नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर. हा तरुण खासदार केवळ धाराशिव जिल्ह्याचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर करून राहिला आहे. आदर्श राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओमराजे.”


नांदगावकर यांनी त्यांच्या प्रामाणिक आणि जनतेसाठी नेहमी उपलब्ध राहणाऱ्या वृत्तीचे विशेष कौतुक केले आहे. “अनेक अमिषे आणि दबाव असतानाही त्यांनी एकनिष्ठ राहून जनतेची सेवा केली, यामुळेच सुमारे 3.30 लाख मतांच्या फरकाने ते खासदार म्हणून निवडून आले,” असे त्यांनी अधोरेखित केले.


अतिवृष्टीच्या काळात ओमराजे निंबाळकर यांचा लोकांमध्ये वावर अधोरेखित करताना नांदगावकर म्हणाले की, “सध्याच्या पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्तीमध्ये ओमराजे केवळ कोरड्या गप्पा मारत नाहीत, तर थेट लोकांसोबत ग्राउंडवर उतरून प्रसंगी जीव धोक्यात घालून मदतकार्य करत आहेत. हेच खरे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे.”


यापुढे नवीन पिढीने राजकारणाचा तिरस्कार न करता ओमराजेकडे आदर्श म्हणून पाहावे, असेही आवाहन नांदगावकर यांनी केले आहे. “बॉलिवूड सेलिब्रिटींना आयडॉल मानणाऱ्या तरुणांनी खऱ्या आयडॉलचा शोध घेतला पाहिजे. ओमराजे निंबाळकर हे आजच्या राजकारणातील खरे प्रेरणास्थान आहेत,” असे त्यांनी नमूद केले.


शेवटी ओमराजे यांना थेट भावनिक शब्दांत साद घालत नांदगावकर म्हणाले, “तू लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करतो आहेस ते उत्कृष्ट आहे. पण या कामात स्वतःची काळजी घे कारण तुझ्यावर लाखो लोक प्रेम करतात. त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या आधारासाठी तुझे असणे खूप महत्त्वाचे आहे. राजकारणी म्हणून नव्हे, तर तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे.”


या पोस्टनंतर ओमराजे निंबाळकर यांचे कार्य आणि त्यांच्याबद्दलचा जनतेचा विश्वास याबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या