Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेचे पिवळे वादळ;सौ.नीता विकास जाधव यांच्या उमेदवारीनंतर प्रचाराला वेग;मतदारांमध्ये उत्साह

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगरूळ जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापू लागले असून, यशवंत सेनेच्या प्रवेशामुळे संपूर्ण गटात चांगलीच खळबळ उडाली आहे. यशवंत सेनेतर्फे सौ.नीता विकास जाधव यांना मंगरूळ जिल्हा परिषद गटासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू झाला असून, गटातील प्रत्येक गावात यशवंत सेनेचे पिवळे झेंडे फडकताना दिसत आहेत.


उमेदवारी जाहीर होताच नीता विकास जाधव यांनी गावोगावी संपर्क दौरे सुरू केले आहेत. सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक आणि शेतकरी वर्गातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रचार सभांमध्ये मोठ्या संख्येने मतदार सहभागी होत आहेत. यामुळे यशवंत सेनेबाबत गटात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.


विशेष म्हणजे, यशवंत सेनेने नूतन तालुक्यात दमदार एन्ट्री घेत अनेक ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे पारंपरिक राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून, विरोधकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या प्रश्नांना यशवंत सेना वाचा फोडत असल्याने मतदारांचा कल या नव्या पर्यायाकडे झुकताना दिसत आहे.


मंगरूळ जिल्हा परिषद गटासोबतच आरळी बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये रविकिरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने यशवंत सेनेचा प्रचार संपूर्ण तालुक्यात वेगाने पसरत आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, घरोघरी संपर्क, बैठका, प्रचार फेऱ्या यावर भर देण्यात येत आहे.


गटातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण यांसारख्या मुद्द्यांवर यशवंत सेनेचे उमेदवार स्पष्ट भूमिका मांडत आहेत. “सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी लढणारी सेना” अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याला मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.


यशवंत सेनेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, मंगरूळ जिल्हा परिषद गटात सेनेचे खाते उघडण्याची शक्यता आता अधिक बळावली आहे. प्रचारात दिसणारी गर्दी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांमधील सकारात्मक चर्चा यामुळे राजकीय विश्लेषकांकडूनही यशवंत सेनेची दखल घेतली जात आहे.


येणाऱ्या काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, यशवंत सेना विरोधकांसमोर मोठ्या ताकदीने उभी राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मंगरूळ गटातील ही निवडणूक आता चुरशीची होणार असून, यशवंत सेनेचे पिवळे वादळ किती प्रभावी ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या