प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : आगामी धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत असून, ‘यशवंत सेना’ या नावाने एक नवा पर्याय समोर आला आहे. शिवसेना, भाजप तसेच इतर पक्षांतील ज्या निष्ठावंत पदाधिकारी व इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी या नव्या गटाचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. धाराशिव, तुळजापूर आणि कळंब या तीन तालुक्यांतून मोठ्या संख्येने इच्छुकांनी ‘यशवंत सेने’कडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘यशवंत सेना’ गटाचे महाविकास आघाडीकडे झुकते माप असून, चर्चा व वाटाघाटी करून काही ठिकाणी जागा पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याबदल्यात निवडणुकीत मदत करण्याची तयारीही या गटाने दर्शविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे हा गट केवळ राजकीय पाठबळावरच नव्हे, तर रसद, नियोजन व संघटनात्मक ताकदीसह मैदानात उतरल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शिवसेना-भाजप युती झाल्याचा दावा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जात असला, तरी या कथित युतीला तळागाळातील शिवसैनिकांचा तीव्र विरोध पाहायला मिळत आहे. स्थानिक शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता युती केल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. त्यातूनच काही नाराज शिवसैनिकांनी ‘यशवंत सेनेचा’ मार्ग निवडला असून, तर काहींनी थेट अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत.
धाराशिव जिल्हा परिषदेत एकूण ५५ जागा असून, भाजप-सेना युतीत सन्मानजनक जागा वाटप झाले नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः भुम, परंडा व वाशी या भागांत आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या विरोधात भाजपसह विविध पक्ष एकवटल्याचे चित्र आहे. तसेच उमरगा व लोहारा तालुक्यांतही अद्याप राजकीय गणिते स्पष्ट झालेली नाहीत.
या पार्श्वभूमीवर, नाराज शिवसैनिक, उमेदवारीपासून वंचित भाजप व इतर पक्षांतील इच्छुक उमेदवार व समविचारी पदाधिकारी यांनी एकत्र येत ‘मोट’ बांधली आहे, आणि त्या माध्यमातून ‘यशवंत सेने’कडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. भाजपला धडा शिकवण्यासाठीच हा पर्यायी मार्ग स्वीकारल्याची उघड भूमिका या गटाकडून घेतली जात आहे. “नेते मॅनेज झाले तरी कार्यकर्ते झुकणार नाहीत,” अशी ठाम भूमिका अनेक शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
सध्या उमेदवारी अर्जांची छानणी सुरू असून, २७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर राजकीय वाटाघाटी, समजुती व आघाड्या बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचे अंतिम चित्र अधिक स्पष्ट होणार असून, ‘यशवंत सेना’ हा घटक किंगमेकर ठरणार की थेट लढत देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या