प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर तालुका विधीज्ञ मंडळाची सन २०२६ साठीची निवडणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत विधीज्ञांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या पसंतीचे नेतृत्व निवडले. या निवडणुकीत अध्यक्ष, सचिव, सहसचिव व कोषाध्यक्षपदासाठी लढत झाली असून सर्व पदांवर एकमताने व विश्वासाने निवड झाली आहे.
अध्यक्षपदी ॲड. जयवंत शिवजीराव इंगळे यांनी ८७ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वावर विधीज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे. सचिवपदी ॲड. परीक्षित सुनितराव पाठक यांनी ७८ मते मिळवत विजय मिळवला. सहसचिवपदी ॲड. रफिक नजीर फुटाणकर यांनी तब्बल १०० मते घेत स्पष्ट बहुमताने विजय मिळवला. तर कोषाध्यक्षपदी ॲड. नितीन महाकांत चंदनशिवे यांनी ८० मते घेऊन यश संपादन केले.
या निवडणुकीत सर्व पदांवर एकाच पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याने संपूर्ण पॅनलने मतदार विधीज्ञांचे मनःपूर्वक आभार मानले. विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, तुळजापूर तालुक्यातील विधीज्ञांचे प्रश्न, न्यायालयीन सुविधा, वकिलांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, तसेच विधीज्ञ मंडळाची प्रतिष्ठा व एकता अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले जाईल.
नवनिर्वाचित पॅनलने निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला असून विधीज्ञांच्या हितासाठी पारदर्शक, संघटित व सकारात्मक कार्यपद्धती राबविण्याचे आश्वासन दिले आहे. या यशामुळे तुळजापूर तालुका विधीज्ञ मंडळात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात मंडळ अधिक सक्षमपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


0 टिप्पण्या