Ticker

6/recent/ticker-posts

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुर्टा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर:आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळकोट जिल्हा परिषद गटातील मुर्टा (ता. तुळजापूर) येथे शिवसेना पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही बैठक तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न झाली.


या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच प्रत्येक इच्छुक उमेदवाराचा आतापर्यंतचा पक्षासाठी केलेला कार्यअहवाल सविस्तरपणे जाणून घेण्यात आला. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक मजबुती, जनसंपर्क, तसेच पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला.


बैठकीदरम्यान तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी सांगितले की, इच्छुक उमेदवारांनी मांडलेल्या सर्व मागण्या, सूचना व कार्याचा संपूर्ण अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे. पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील आणि ज्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली जाईल, त्या उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना ताकदीने उभी राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.


“पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार कोणालाही उमेदवारी मिळाली तरी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता एकदिलाने काम करेल.शिवसेनेचा भगवा झेंडा जिल्हा परिषद व पंचायत समितीवर फडकविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असे आश्वासन यावेळी उपस्थितांना देण्यात आले.


या बैठकीला तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव,उपतालुकाप्रमुख शहाजी हाक्के,तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे,संजय लोंढे,बाळासाहेब भय्ये,स्वप्निल सुरवसे,अंनिता लष्करे,सारिखा चुंगे तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत निवडणूक रणनिती, संघटन बळकटीकरण आणि येणाऱ्या काळातील पक्षाच्या वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


दरम्यान, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी जळकोट जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकतात, याकडे संपूर्ण जळकोट जिल्हा परिषद गटासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या