Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिवमध्ये IMD कडून रेड अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : भारतीय हवामान विभागाने (IMD) धाराशिव जिल्ह्यासाठी पुढील काही तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात जोरदार ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहण्याचा धोका आहे. पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे, सुरक्षित स्थळी थांबावे आणि जीर्ण घर किंवा इमारतींपासून दूर राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.


अनेक ठिकाणी रस्ते बंद होण्याची शक्यता असून, विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नदी-नाल्याच्या काठावर जाण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.


धाराशिव जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा उच्च सतर्कतेवर असून, संबंधित विभागांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथके, पोलीस, महसूल व आरोग्य विभाग तत्परतेने काम करत आहेत. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध ठेवण्यात आली आहे.


नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. "हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेणे, हेच सुरक्षिततेचे साधन ठरणार आहे," असे प्रशासनाने नमूद केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या