Ticker

6/recent/ticker-posts

माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे अपघाती निधन : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शोककळा

प्रतिनिधी : अशोक गरड 

लातूर – माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे सोमवारी एका भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. तुळजापूर–लातूर मार्गावर बेलकुंडजवळ त्यांच्या खासगी वाहनाला झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.


आर. टी. देशमुख हे सोलापूर येथून माजलगावकडे परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. दरम्यान, जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने आणि रस्ता निसरडा झाल्याने त्यांची फॉर्च्यूनर गाडी नियंत्रणाबाहेर गेली. परिणामी गाडी बेलकुंडजवळील राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर जोरात आदळली. या धडकेत वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि देशमुख गंभीर जखमी झाले.


अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय पथकाने उपचार सुरू केले होते, मात्र दुखापतींमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि काही तासांच्या उपचारांनंतर त्यांचे निधन झाले.


आर. टी. देशमुख हे माजलगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून कार्यरत राहिले असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात विविध विकासकामे राबविली होती. अभ्यासू, शांत, आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या देशमुख यांच्या निधनामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचे आणि नेतृत्वाचे मोठे नुकसान झाले आहे.


राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. माजलगाव, बीड, लातूर आणि परिसरातून नागरिकांनी रुग्णालयात व नंतर त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, त्यांच्या पार्थिवावर उद्या माजलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


आर. टी. देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या