Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर शहरातील अस्वच्छतेबाबत नगरपरिषदेला नगरसेवकांचे निवेदन

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळजापूर शहरामध्ये ठिकठिकाणी वाढलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून,याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणी करत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.


शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये नाल्या व गटारी मोठ्या प्रमाणात कचरा,घाण व गाळ साचल्यामुळे तुंबलेल्या आहेत.परिणामी गटारीतील दूषित पाणी थेट रस्त्यावर वाहत असून,त्यातून मच्छरांची उत्पत्ती वाढली आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून डेंग्यू,मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.


तसेच तुळजापूर ही धार्मिक व तीर्थक्षेत्राची नगरी असल्याने दररोज हजारो भाविक शहरात दाखल होतात.मात्र सध्याच्या अस्वच्छतेमुळे भाविकांमध्ये शहराबाबत नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याची भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.


शहरातील अनेक ठिकाणी गटारींच्या चेंबरवरील झाकणांची अवस्था अतिशय दयनीय असून,काही ठिकाणी ती तुटलेली अथवा गायब आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित चेंबरची तातडीने दुरुस्ती करून नवीन झाकणे बसवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.



याशिवाय शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच सार्वजनिक परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मंजूर ठिकाणच्या कचरा कुंड्यांची वेळेवर साफसफाई होत नसून,कचरा घंटागाडी दररोज व वेळेत सर्व भागात फिरत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.


या सर्व बाबी लक्षात घेता तुळजापूर शहरातील सर्व नाल्या, गटारी, परिसर व सार्वजनिक स्वच्छतागृहे तातडीने स्वच्छ करण्यात यावीत. तसेच कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवावे, अशी ठाम मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


या निवेदनावर नगरसेवक अमोल कोतवळ,नगरसेवक अक्षय परमेश्वर,नगरसेवक रणजीत इंगळे,नगरसेवक आनंद जगताप व नगरसेवक प्रगती लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या असून,लवकरात लवकर कारवाई न झाल्यास नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या