प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर नगरपरिषदेचे ज्येष्ठ व पाचव्यांदा निवडून आलेले नगरसेवक श्री. पंडितराव देविचंद जगदाळे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श पाऊल उचलले आहे. नगरसेवक पदावर कार्यरत असताना मिळणारे सर्व मीटिंग भत्ते (मानधन) हे नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र. ३, तुळजापूर (खुर्द) या शाळेला देण्यात यावेत, अशी लेखी विनंती त्यांनी नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र. ३ ही शाळा तुळजापूर शहरातीलच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. सदर शाळेने सन 2008-2009 व 2009-2010 या शैक्षणिक वर्षात लातूर विभागात सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच सन 2017 मध्ये मराठवाड्यातील ISO मानांकन मिळवणारी पहिली नगरपालिका शाळा होण्याचा मानही या शाळेला मिळाला आहे. विशेष म्हणजे ही शाळा महाराष्ट्रातील सौरऊर्जेवर चालणारी पहिली शाळा म्हणूनही ओळखली जाते.
सध्या या शाळेत ४४७ विद्यार्थी शिक्षण घेत असून १४ शिक्षक गुणवत्तापूर्ण अध्यापन करत आहेत. अशा या गुणवत्तापूर्ण शाळेच्या विकासासाठी नगरसेवक पंडितराव जगदाळे यांनी आपले मानधन देण्याचा निर्णय घेतल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
विशेष बाब म्हणजे, श्री. जगदाळे यांनी यापूर्वीही सन 2001 पासून नगरसेवक पदाचे तसेच सन 2017 मधील प्रभारी नगराध्यक्ष पदाचे मानधन या शाळेला दिलेले आहे. सन 2025 च्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांनी हीच परंपरा कायम ठेवत शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नगरसेवक पंडितराव जगदाळे यांचा हा निर्णय लोकप्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी कशी जपावी याचे उत्तम उदाहरण असून, त्यांच्या या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. शहरातील नागरिक, शिक्षकवर्ग व पालकांकडून या निर्णयाचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या