प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा माजी पालकमंत्री तथा आमदार तानाजी सावंत हे पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत अनेक ठिकाणी नगराध्यक्षपदी आपल्या समर्थक उमेदवारांना विजयी करून दाखवले. या यशानंतर आता आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात सक्रिय हालचाली सुरू केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर सोमवार, दिनांक 5 जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्यातील तेरणा सहकारी साखर कारखाना, ढोकी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या अनुषंगाने विजयी संकल्प मेळावा व भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण मेळाव्यास माजी पालकमंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तानाजी सावंत हे उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. संघटन बळकट करणे, निवडणूक रणनिती, तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा या मेळाव्यात होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
तानाजी सावंत यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे जिल्ह्यातील विरोधकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांतील यशानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही ते आपली पकड मजबूत ठेवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली किती जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य निवडून येतात, याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले असून, येणारा काळ जिल्ह्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, या विजयी संकल्प व शेतकरी मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या