प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या पवित्र प्रसादाबाबत आमदार तानाजी सावंत यांनी केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह, निंदनीय आणि भाविकांच्या श्रद्धेवर घाला घालणारे असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे तुळजापूर तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी केला आहे. तुळजाभवानी मातेच्या प्रसादाला ‘ड्रग’ अशी उपमा देणे हा केवळ बेजबाबदारपणा नसून, कोट्यवधी भवानी भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारा प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कंदले म्हणाले की, तुळजाभवानी मातेचा प्रसाद हा भाविकांसाठी मातेचा आशीर्वाद असून त्याचा अपमान करण्याची हिम्मत कोणालाही नसावी. राजकीय वैफल्यातून देव, धर्म आणि श्रद्धेला लक्ष्य करणे ही मानसिक दिवाळखोरी असून अशा वक्तव्यांचा भाजप तीव्र निषेध करत आहे. आमदार सावंत यांनी तात्काळ आई तुळजाभवानीच्या भक्तांची आणि तुळजापूरच्या जनतेची जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
तुळजापूर नगरीच्या जनतेने लोकनेते आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना बहुमताने निवडून देऊन आई भवानीच्या नगरीची सेवा करण्याची संधी दिली आहे. मात्र, ड्रग प्रकरणाशी संबंधित वक्तव्यांमधून नगराध्यक्षांचा तसेच तुळजापूरच्या जनतेच्या जनादेशाचा अपमान केल्याचा आरोपही आनंद कंदले यांनी केला.
“आई तुळजाभवानी मातेचा अपमान हा केवळ वक्तव्याचा विषय नाही, तर तो संपूर्ण भवानी भक्तांच्या भावना दुखावण्याचा गंभीर विषय आहे. श्रद्धेवर घाला घालणाऱ्यांना रस्त्यावरून, कायदेशीर मार्गाने आणि लोकशाही पद्धतीने उत्तर दिले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आमदार तानाजी सावंत यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा भवानी भक्त आणि तुळजापूरची जनता शांत बसणार नाही, असे सांगत भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजप तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी दिला आहे.

0 टिप्पण्या