प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर शहरातील सामाजिक सलोखा व एकतेचे प्रतीक असलेल्या आझाद बहुउद्देशी सामाजिक संस्था यांच्या वतीने तुळजापूर नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे तसेच सर्व नगरसेवकांचा भव्य व जंगी सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असताना, या सत्कार समारंभाने सामाजिक एकोपा आणि बंधुत्वाचे सुंदर दर्शन घडविले.
या प्रसंगी नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे व सर्व नगरसेवकांना शाल, पुष्पहार प्रदान करून गौरविण्यात आले. आझाद बहुउद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देताना नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे यांनी आझाद बहुउद्देशी सामाजिक संस्थेचे आभार मानत सांगितले की, “तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख व विकासाभिमुख कारभार करण्याचा आमचा निर्धार आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम हेच आमच्या कामाची प्रेरणा आहे.”
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांकडून तुळजापूर शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व पर्यटन विकास यासाठी ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली. शहराच्या प्रगतीसाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
हा सत्कार समारंभ म्हणजे केवळ गौरवाचा क्षण नसून, सामाजिक एकोपा, बंधुता आणि तुळजापूर शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक सकारात्मक व प्रेरणादायी पाऊल असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.

0 टिप्पण्या