Ticker

6/recent/ticker-posts

ऍट्रॉसिटी प्रकरणातील अर्थसाह्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ५ हजारांची लाचमागणी

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयात ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडित तक्रारदारास मिळणाऱ्या अर्थसाह्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांनी यशस्वी कारवाई करत समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली.


या प्रकरणात तक्रारदार पुरुष (वय 47 वर्षे) असून त्यांनी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, दिनांक 04 डिसेंबर 2025 रोजी ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करून देण्यासाठी समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी 20 हजार रुपये, तर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रमेश मालू वाघमारे (वय 37 वर्षे) यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप होता.


तक्रारीची गांभीर्याने दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 04, 07 व 11 डिसेंबर 2025 रोजी पडताळणी केली. या दरम्यान पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न न झाले. मात्र कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे यांनी अर्थसाह्याचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी पंचासमक्ष 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.


पडताळणीत तक्रार सत्य आढळून आल्याने दिनांक 11 व 12 डिसेंबर 2025 रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली. मात्र संशय आल्याने आरोपी रमेश वाघमारे यांनी तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास नकार देत भेट टाळली. अखेर आज आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.


ही कारवाई समाजकल्याण कार्यालय, धाराशिव येथे करण्यात आली. आरोपीच्या अंगझडतीत होंडा ॲक्टिवा स्कुटी (अंदाजे किंमत 40 हजार रुपये), वनप्लस कंपनीचा मोबाईल (अंदाजे 10 हजार रुपये) व दोन पेन आढळून आले. मोबाईल हँडसेटची तपासणी सुरू असून आवश्यक असल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तसेच आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.


या सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक बाळासाहेब मनोहर नरवटे (ला.प्र.वि. धाराशिव) यांनी केले. सदर कारवाईवर पोलीस उप अधीक्षक योगेश वेळापुरे यांनी पर्यवेक्षण केले. सापळा पथकात पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, विजय वगरे, पोलीस हवालदार आशिष पाटील, पोलीस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी व शशिकांत हजारें यांचा समावेश होता.


या कारवाईस पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक श्री. शशिकांत शिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.


दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या खासगी व्यक्तीने शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.


भ्रष्टाचाराविरोधातील तक्रारीसाठी

टोल फ्री क्रमांक : 1064

पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर : 9011092777

पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव : 9270231064 / 9049519833




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या