प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विकासाचे धोरण आणि ठोस दृष्टिकोन समोर ठेवत शहरातील जनतेने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद ( पिंटू ) गंगणे यांना प्रचंड बहुमताने विजयी केले. या विजयानंतर उद्या तुळजापूर नगर परिषद कार्यालयात लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विनोद ( पिंटू ) गंगणे यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार असून, त्याच दिवशी ते नगराध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारणार आहेत.
मागील चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या तुळजापूर नगर परिषदेला आता लोकनियुक्त नेतृत्व मिळणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय कालावधीत रखडलेली अनेक विकासकामे, मूलभूत सुविधा, नागरी प्रश्न तसेच नियोजनाच्या अडचणी आता दूर होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
शपथविधी सोहळ्यास जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,व्यापारी संघटना तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.या सोहळ्यामुळे तुळजापूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगराध्यक्षपद स्वीकारल्यानंतर शहरातील रस्ते,पाणीपुरवठा,स्वच्छता,ड्रेनेज व्यवस्था,पर्यटन विकास,धार्मिक स्थळांचा विकास तसेच नागरी सुविधांवर विशेष भर देण्यात येईल,असा आशावाद समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे विनोद ( पिंटू ) गंगणे यांनी विजयावेळी स्पष्ट केले होते.
चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषदेला लोकप्रतिनिधींचे नेतृत्व लाभत असल्याने तुळजापूर शहरासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरणार असून, आगामी काळात शहराच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या