प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे पाच नगरसेवक निवडून आणले असून नगरपालिकेतील महाविकास आघाडीच्या अधिकृत गटनेतेपदी काँग्रेस पक्षाचे नुतन नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
नगरपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात समन्वय साधत नगरपालिकेतील भूमिका ठरवण्यासाठी ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात नगरपरिषदेत सक्षम, अभ्यासू आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणारा गटनेता असावा, या निकषावर अमोल कुतवळ यांच्या नावावर सर्वांची एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
या निवडीबाबतचे अधिकृत शिफारस पत्र काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले असून, त्यामुळे महाविकास आघाडीचा अधिकृत गट आणि गटनेतेपदाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अमोल माधवराव कुतवळ हे तुळजापूर शहरातील परिचित व अनुभवी राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक कार्य, नगरपरिषदेतील प्रशासनाचा अभ्यास तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवणारे जनसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि संयमी नेतृत्वाचा लाभ महाविकास आघाडीला नगरपरिषदेत प्रभावीपणे घेता येईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
गटनेतेपद स्वीकारल्यानंतर अमोल कुतवळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,“महाविकास आघाडीतील सर्व नगरसेवकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन.तुळजापूर शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पर्यटन विकास तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर नगरपरिषदेत ठाम व आक्रमक भूमिका मांडली जाईल. सत्ताधारी पक्षावर आवश्यक त्या ठिकाणी जाब विचारण्यास महाविकास आघाडी कधीही मागे राहणार नाही.”
नगरपरिषदेत संख्याबळाच्या दृष्टीने महाविकास आघाडीचा गट महत्त्वाचा ठरणार असून, अनेक विषयांवर त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गटनेते म्हणून अमोल कुतवळ यांच्यावर मोठी जबाबदारी आली असून, नगरपरिषदेत सशक्त विरोधकाची भूमिका बजावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिकांकडून अमोल कुतवळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी अमोल माधवराव कुतवळ यांची निवड झाल्याने तुळजापूर नगरपरिषदेत आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचे चित्र आहे.

0 टिप्पण्या