Ticker

6/recent/ticker-posts

मतदान व मतमोजणीच्या तारखा बदलल्या;जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक सुधारित

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

मुंबई:राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सुधारित आदेश जारी करत मतदान 7 फेब्रुवारी 2026 रोजी तर मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.


यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार प्रक्रिया पूर्ण होणार होती. मात्र विविध कारणांमुळे निवडणूक टप्प्यांमध्ये बदल करणे अपरिहार्य ठरले असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 12 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 जानेवारीनंतर दोन आठवड्यांची अतिरिक्त मुदत दिली होती. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरू होत्या.


मात्र 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य सरकारने 28 ते 30 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय दुखवटा जाहीर केला. या दुखवटा कालावधीत राजकीय कार्यक्रम, प्रचार सभा व सार्वजनिक कार्यक्रम टाळले जात असल्याने निवडणूक प्रचार करणे उमेदवारांसाठी अशक्य ठरणार होते.


निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दुखवटा कालावधीत प्रचार करणे व्यवहार्य नसल्याने तसेच निवडणुकीचे विविध टप्पे ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडणे शक्य नसल्यामुळे मतदान व मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, सुधारित वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व मतदारांनी सुधारित तारखांची नोंद घ्यावी, असे आवाहनही आयोगाने केले आहे.


दरम्यान, निवडणूक पुढे ढकलल्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून उमेदवारांना प्रचारासाठी अतिरिक्त वेळ मिळाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या