प्रतिनिधी : जुबेर शेख
मुंबई:राज्याच्या राजकारणावर भावनिक छाया टाकणाऱ्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. अजितदादांच्या जाण्याने केवळ पक्ष नव्हे, तर संपूर्ण राज्य हादरले असताना आता पुढील वाटचालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी काही नेत्यांनी मांडल्याचे समजते. मुख्यमंत्री यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करण्यात आली असून, त्यांनीही जबाबदारी स्वीकारण्याबाबत होकार दिल्याची माहिती पुढे येत आहे.
अजितदादांच्या राजकीय वारशाला पुढे नेण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर येऊ शकते, अशी भावना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. “अजितदादा केवळ नेता नव्हते, ते आमच्या संघर्षाचा आवाज होते,” अशी भावना अनेक आमदार आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यांच्या आठवणींनी डोळे पाणावलेल्या अवस्थेत पक्ष पुढील निर्णयासाठी एकवटत आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर हा निर्णय अंतिम झाला, तर तो केवळ राजकीय नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही राज्यासाठी महत्त्वाचा क्षण ठरेल.
अजितदादांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याची जबाबदारी, पक्षातील एकजूट टिकवण्याचे आव्हान आणि राज्याच्या विकासाचा ध्यास—या साऱ्यांच्या केंद्रस्थानी आता सुनेत्रा पवार असतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. उद्याचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

0 टिप्पण्या