Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या:तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : अलीकडील दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) चे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्याची मागणी केली आहे.


या संदर्भात बोलताना तालुकाप्रमुख अमोल जाधव म्हणाले की, "शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने तातडीने पुढाकार घेणे आवश्यक आहे."


या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नुकसानग्रस्त भागाला मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की, प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य तेवढी आर्थिक मदत दिली जाईल आणि पंचनामे करून लवकरात लवकर मदत पोहोचवली जाईल.

स्थानिक नागरिक व शेतकरी यांनी शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, तालुक्यातील विविध भागातील पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून मदतीसाठी प्रशासन सज्ज असल्याचेही कळते.


तालुकाप्रमुखांच्या या मागणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनामुळे शेतकरी वर्गामध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या