प्रतिनिधी: जुबेर शेख
तुळजापूर : शिवसेना महिला आघाडी धाराशिवच्या संपर्कप्रमुख ॲड. संगीता चव्हाण व तालुका प्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर येथील पक्ष कार्यालयात महिला आघाडीची भव्य बैठक उत्साहात पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीत महिला आघाडीने आगामी काळात संघटनात्मक बळकटीसाठी आणि निवडणुकीच्या तयारीसाठी ‘ॲक्शन मोड’ स्वीकारल्याचे स्पष्ट झाले.
या बैठकीत जिल्हा स्तरावर महिला आघाडीच्या कार्याला गती देण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लवकरच शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख पदाची अधिकृत घोषणा होणार असल्याने, या नावाकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कोणत्या महिला नेतृत्त्वाला ही जबाबदारी मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून, यामुळे महिला आघाडीमध्ये नवा उत्साह संचारला आहे.
बैठकीसाठी विविध भागांतून महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यामध्ये मीना सोमाजी, लता हारोळकर, अरुणा कावरे, माधुरी पाटील, माधुरी कुडे, श्वेता कावरे, सारिका तेलंग यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी आपल्या भाषणांतून महिला सक्षमीकरण, संघटन विस्तार आणि पक्षप्रवासी अभियान यावर भर देण्याची गरज व्यक्त केली.
संघटनात्मक दृष्टीने ही बैठक अत्यंत यशस्वी ठरली असून, जिल्हा पातळीवर महिला नेतृत्वाची क्षमता आणि इच्छाशक्ती याचा ठसा या बैठकीत उमटला. शिवसेना महिला आघाडी आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक भागात पोहोचून महिला कार्यकर्त्यांचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
शिवसेनेच्या महिला आघाडीने आता पुढील आंदोलनं, सभा, प्रशिक्षण शिबिरे आणि निवडणुकीच्या दृष्टीने तयारी यांचे नियोजन हाती घेतले असून, जिल्ह्यात महिला आघाडीचा आवाज अधिक बुलंद होणार याची चाहूल या बैठकीने निश्चित दिली आहे.
0 टिप्पण्या