Ticker

6/recent/ticker-posts

"हरित धाराशिव" उपक्रमाची एशिया वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद – एकाच दिवशी १५ लाख वृक्ष लागवडीचा ऐतिहासिक उपक्रम

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने आणि जनतेच्या उत्स्फूर्त सहभागातून राबवण्यात आलेल्या "हरित धाराशिव" उपक्रमाने आज एक नवा इतिहास रचला आहे. एकाच दिवसात तब्बल १५ लाख वृक्षांची लागवड करण्यात येऊन हा उपक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेला आहे.


या उल्लेखनीय उपक्रमाची सुरुवात आज (दि. १९ जुलै) सकाळी शिंगोली येथे झाली. शुभारंभप्रसंगी राज्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार राणा पाटील, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, विविध प्रशासकीय अधिकारी, सर्वपक्षीय नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दुपारी २ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ५ लाखांहून अधिक वृक्षांची यशस्वी लागवड झाली होती. संपूर्ण दिवस चाललेल्या मोहिमेच्या अखेरीस, १५ लाख वृक्षांचे रोपण करून प्रशासनाने रचलेले शिवधनुष्य यशस्वीपणे पार पाडले.


धाराशिव जिल्ह्यातील २३४ ग्रामपंचायती, .१० नगरपालिका, शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.


शिंगोली येथील मुख्य कार्यक्रमात ५ हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात आली.


"एक पेड मां के नाम" या संकल्पनेतून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी प्रतिकात्मक वृक्ष लागवड करत सामाजिक संदेश दिला.


हा उपक्रम पर्यावरण रक्षण, हवामान बदलावर प्रतिबंध, तसेच हरित आच्छादन वाढवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आला.


या उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अधिकृत नोंद झाली असून, जिल्ह्याचे नाव जागतिक पटलावर अधोरेखित झाले आहे. या कामगिरीसाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा विशेष गौरव करण्यात आला.


"हे केवळ वृक्षारोपण नव्हे तर भविष्याच्या पिढ्यांना शुद्ध हवा आणि हरित जीवन देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे," असे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि जनतेच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.


"हरित धाराशिव" हा उपक्रम भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार असून, जिल्ह्याचा पर्यावरण पूरक विकास करण्याचा निर्धार यातून स्पष्टपणे दिसून येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या