Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांची नाशिक येथे बदली

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात आपल्या कार्यकुशल नेतृत्वामुळे व विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेमुळे त्यांची बदली आता नाशिक येथे झाली असून, तेथेही त्यांच्याकडून कृषी विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


रवींद्र माने हे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध शासकीय कृषी योजना प्रभावीपणे राबविल्या. शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविणे, कृषी प्रशिक्षण शिबिरे, पिक सर्वेक्षण, सेंद्रिय शेतीचा प्रसार, तसेच आत्मा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, खरीप व रब्बी हंगाम नियोजन अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.


त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळाले. कृषी विभागात कार्यरत असताना त्यांनी कृषी सहाय्यक व इतर कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वामुळे विभागीय कार्यात पारदर्शकता व गतिशीलता आली.


धाराशिवमधून नाशिक येथे बदली झाल्यानंतर रवींद्र माने यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या येणार आहेत. नाशिक हा राज्यातील महत्त्वाचा कृषी जिल्हा मानला जातो. त्यामुळे त्यांचे अनुभव, योजना अंमलबजावणीतील कौशल्य आणि शेतकऱ्यांशी असलेली जवळीक नाशिक जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


शेतकरी बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव


रवींद्र माने यांच्या बदलीनंतर धाराशिवमधील अनेक शेतकरी संघटनांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या सेवेसाठी धन्यवाद व्यक्त केले आहेत. त्यांच्या कार्यशैलीची प्रशंसा करताना, “माने सरांनी खरोखर शेतकऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण आणि मार्गदर्शक भूमिका बजावली,” असे अनेकांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या