प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) मध्ये मोठी संघटनात्मक बदलाची घडामोड झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे यांनी डॉ. श्री प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील यांची धाराशिव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र आज अधिकृतपणे दिले.
या नियुक्तीनंतर धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉ. पाटील हे पक्षाचे निष्ठावंत, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन वरिष्ठ नेते — संजय दुधगावकर आणि संजय निंबाळकर — यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिल्याची मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.
संजय दुधगावकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा, तर संजय निंबाळकर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी हे दोन्ही नेते बारामती येथे पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजीनामे सादर केले.
धाराशिव शहरातील काही पक्ष नेत्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतल्याची चर्चा असून, याच कारणास्तव या दोन्ही नेत्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद आणि असंतोषामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये नवी उर्जा निर्माण होईल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

0 टिप्पण्या