Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांची बदली; परभणीत उपजिल्हाधिकारी (रोहयो) म्हणून नियुक्ती

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत शुक्रवारी सायंकाळी उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी सौ. शोभादेवी जाधव यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती परभणी जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना - रोहयो) या पदावर करण्यात आली आहे.

महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार, सौ. जाधव यांनी तत्काळ धाराशिव येथील पदमुक्त होऊन नवीन पदावर कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

धाराशिवमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना सौ. जाधव यांनी प्रशासनातील अनेक महत्त्वाची कामे प्रभावीपणे पार पाडली होती. विशेषतः नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, विविध आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन, तसेच महसूल विषयक शासकीय योजना यांचे सुयोग्य व्यवस्थापन त्यांनी केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे जिल्ह्यातील नागरिक व प्रशासन यांच्यात सुसंवाद राखला गेला होता.

या बदलीनंतर त्यांच्या जागी कोणत्या अधिकाऱ्याची वर्णी लागणार याबाबत आता जिल्हा प्रशासन व नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. महसूल व वन विभागाच्या ताज्या आदेशांनुसार राज्यातील अनेक उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, हे नियमित फेरबदलाचेच एक अंग असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, सौ. शोभादेवी जाधव यांना नव्या पदावर रुजू होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. धाराशिवमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या