प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : राज्यातील दिव्यांग बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यभरात हक्क यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या अनुषंगाने दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व शेतकरी हक्क मेळावा येत्या रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगरपालिका धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात दिव्यांगांना मासिक पेन्शन सहा हजार रुपये मिळावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व सातबारा कोरा मिळावा, शेतमालाला हमीभाव मिळावा, ऊस, केळी, डाळिंब यांसारख्या उत्पादनांना योग्य दर मिळावा तसेच शेतमजूर व दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन ठोस भूमिका मांडली जाणार आहे.
बच्चुभाऊ कडू यांनी गेल्या वीस वर्षांपासून दिव्यांगांच्या न्यायासाठी आंदोलन छेडले आहे. रायगड येथे तीन दिवस आमरण उपोषण, अमरावती मोझरी येथे सात दिवस आमरण उपोषण अशा संघर्षांच्या माध्यमातून त्यांनी दिव्यांग पेन्शन दीड हजारवरून अडीच हजार रुपयांपर्यंत वाढवून घेण्यास यश मिळवले. याचे संपूर्ण श्रेय बच्चू कडू यांच्या झुंजार नेतृत्वाला जाते.
या मेळाव्याकरिता संपर्कप्रमुख अमोलजी जगदाळे,प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, जिल्हा , मंगेश ठाकरे, जिल्हाप्रमुख वर्षद शिंदे तसेच बच्चू कडू यांच्या विचाराशी समविचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
परिसरातील दिव्यांग व्यक्ती, शेतकरी बांधव, शेतमजूर, ऊस उत्पादक, केळी व डाळिंब उत्पादक तसेच सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याला यशस्वी करावे, असे आवाहन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्यासह जिल्हा, तालुका व शाखा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
0 टिप्पण्या