Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेसला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का : माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शक्तीशाली प्रवेश

 

प्रतिनिधी : मुदस्सर शेख 

लातूर : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांना आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय धक्का बसला आहे. लातूर शहरातील प्रभावी आणि जनाधार असलेले माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. पक्ष कार्यालय मुंबई येथे हा प्रवेश सोहळा पार पडला.


कार्यक्रमात उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. अजित पवार यांनी गोजमगुंडे यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना म्हटले की, “लातूरच्या विकासासाठी नवीन नेतृत्वाची गरज होती. गोजमगुंडे यांच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नवी ताकद मिळेल.”


विक्रांत गोजमगुंडे यांनी पक्ष प्रवेशानंतर बोलताना सांगितले की,“लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या कामांसाठी मला राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग योग्य वाटला. अजितदादा पवार यांचे नेतृत्व आणि त्यांची कार्यशैली माझ्या मनात आदर निर्माण करते.”


गोजमगुंडे हे लातूर काँग्रेसमधील दमदार चेहरे म्हणून ओळखले जात होते. महापौर पद भुषवताना त्यांनी शहरात अनेक विकासकामे केली असून त्यांचा स्वतंत्र जनाधार आहे. त्यांच्या जाण्यानंतर काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.


अमित देशमुख हे लातूरमधील काँग्रेसचे मुख्य आधारस्तंभ मानले जातात. त्यामुळे त्यांच्या गटातील एक प्रभावी नेतेच राष्ट्रवादीमध्ये गेल्याने आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेससमोर आव्हाने अधिक कठीण होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

गोजमगुंडे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूरमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील त्रिकोणी लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता वाढली आहे.


कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये पक्षाला नवा विस्तार मिळेल असा विश्वास पक्षात व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या