Ticker

6/recent/ticker-posts

प्रभाग क्रमांक दोन ( 2 ) मध्ये भाजप–महाविकास आघाडी–शिवसेना आमने-सामने;विकासाची हाक देत प्रचाराला वेग


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर:तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीची तापती हवा दिवसेंदिवस अधिकच वाढत असून मतदानाच्या दिवसांची जवळीक लक्षात घेता प्रभाग क्रमांक दोन (2) मध्ये तिरंगी लढत आणखीच चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. या प्रभागातून कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात नगरसेवकाची माळ पडणार, याकडे प्रभागातील सर्व मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.


भाजप – महाविकास आघाडी – शिवसेना यांच्यात मुख्य संघर्ष


प्रभाग क्रमांक दोन (2) ब मध्ये भाजप, महाविकास आघाडी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांची लढत तुफान रंगात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रस्तुत केलेल्या रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या वतीने उमेदवार दिल्याने प्रभाग क्रमांक दोन (2) अ मध्ये चौरंगी लढत आहे. सर्वच पक्षांनी प्रभागात आपल्या मोर्चेबांधणीला वेग देत दारोदारी संपर्क मोहीम, छोट्या सभा, कॅम्पेन वाहन दौरे, तसेच युवा मतदारांना केंद्रस्थानी ठेवून आक्रमक प्रचार धोरण आखले आहे.


प्रचारासाठी वेळ कमी असल्याने प्रत्येक उमेदवार हा दिवस-रात्र धावपळीत गुंतलेला दिसत आहे. मतदानापूर्वी प्रत्येक घरात पोहोचण्याचा प्रयत्न करताना उमेदवारांची व्यस्तता आणि रणधुमाळी प्रभागभर जाणवत आहे.


जुने आणि नवे चेहरे — मतदारांची परीक्षा


या प्रभागात काही उमेदवार अनुभवी असून आधीही निवडणूक लढवलेले आहेत, तर काही चेहरे पहिल्यांदाच रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये उमेदवारांची ओळख निर्माण करण्यासाठी नवीन उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे.


सर्वच उमेदवार आपल्या प्रचारामध्ये विकासकामांना प्राधान्य देत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाशव्यवस्था तसेच प्रभागातील आवश्यक नागरी सुविधा या विषयांवर उमेदवार मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.


चिन्ह प्रचारामध्ये मंद गती — मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण


प्रभाग क्रमांक दोन (2) मधील काही भागांमध्ये अद्यापही उमेदवारांनी आपली निवडणूक चिन्हे सर्व मतदारांपर्यंत पोहोचवलेली नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


तर प्रभाग मधील काही भागांत प्रचार अद्याप मंदावलेला असल्याने काही उमेदवारांना शेवटच्या काही दिवसांत प्रचंड गतीने काम करावे लागणार असल्याचे चित्र आहे.


२ डिसेंबर मतदान — ३ डिसेंबरला स्पष्ट होणार प्रभाग क्रमांक दोनचा विजेता


दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असून प्रभाग क्रमांक दोन (2) मधील रहिवाशांमध्ये उत्सुकता आणि तणाव दोन्हीही जाणवत आहे. या तिरंगी संघर्षात मतदार कोणावर विश्वास दाखवतात, कोणाच्या गळ्यात नगरसेवकाची माळ घालतात हे ३ डिसेंबर रोजी मतमोजणीदरम्यान स्पष्ट होणार आहे.


स्पर्धा चुरशीची असल्याने प्रभाग क्रमांक दोनचा निकाल संपूर्ण तुळजापूरचे लक्ष वेधून घेणार हे निश्चितच.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या