प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:तुळजापूर नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्ष,नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान बंद पडलेल्या ईव्हीएमवरून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेत अधिकृत चौकशी केली. संबंधित मशीनचे बटण दाबले तरी प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार त्यांनी नोंदवली.
याबाबत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी तात्काळ दखल घेत दोषपूर्ण यंत्रणा दुरुस्त करून अडथळा दूर केला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, ईव्हीएम बंद पडल्याने काही काळ नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेच्या वेळी शिवसेना नेते श्याम पवार,भाजपचे उमेदवार सागर कदम यांच्यासह निवडणूक विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, उमेदवार अमर मगर यांनी अधिकाऱ्यांना थेट सवाल करत “प्रचाराला काहीच दिवस राहिले आहेत… आम्ही मतदारांकडे पाहू की तुमच्या यंत्रणेकडे?” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे निवडणूक विभागावर तातडीने कारवाईचा दबाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

0 टिप्पण्या