प्रतिनिधी : अशोक गरड
औसा : औसा तालुक्यातील शेतकरी वर्गाला सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून पिकांसह शेतीतील माती खरडून गेल्याने शेतजमिनी उजाड झाल्या आहेत. यामुळे शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे करण्यात आली आहे.
आज औसा तहसील कार्यालयात तहसीलदार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. विशेषतः ज्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे, त्यांना जमीन पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी भरीव अर्थसहाय्य मिळावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून पडझड झाली असून त्या नुकसानीचाही पंचनामा करून बाधित कुटुंबांना मदत द्यावी. पावसामुळे शेतातील गोठे, पशुधन यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने या नुकसानीसाठीही आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर रशीद शेख, भरत सूर्यवंशी, यशवंत भोसले, शामराव साळुंखे पाटील, सल्लाउद्दीन शेख, बाळासाहेब जाधव, अशोक गरड, मारुफ शेख यांसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
शासनाने या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास औसा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शामराव साळुंखे पाटील यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या