प्रतिनिधी : अशोक गरड
लातूर : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, उभ्या पिकांचा चुराडा झाला, शेतकऱ्यांच्या हातचे पीक आणि भविष्य दोन्हीही पाण्याखाली गेले आहे. या पार्श्वभूमीवर “शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांना जगवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत व कर्जमाफी गरजेची आहे”, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे गुरुवारपासून मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. लातूर तालुक्यातील तांदुळवाडी आणि तांदुळजा या गावांत त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. या वेळी त्यांच्या सोबत खासदार संजय राऊत, आमदार अमित देशमुख, आमदार प्रवीण स्वामी, नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, माजी आमदार धीरज देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा आक्रोश : "जमीनच वाहून गेली"
शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी सरकारने दिलेली मदत पुरेशी आहे का, असा सवाल केला. त्यावर शेतकऱ्यांनी “आमची जमीनच वाहून गेली आहे. आता नवीन माती टाकण्यापासून सुरू होणाऱ्या अनेक खर्चासाठी सरकारकडून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळावी आणि संपूर्ण कर्जमाफी व्हावी”, अशी मागणी केली.
"सरकारची मदत वेळेवर व पुरेशी नाही" – ठाकरे
या परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की,
मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग आहे. येथे अवर्षणाचे संकट दरवर्षीच असते. मात्र यंदा पहिल्यांदाच अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे.
सरकारने जाहीर केलेली मदत ही 2023 च्या निकषांप्रमाणे आहे. पण आजच्या परिस्थितीतील नुकसान पाहता ती मदत तुटपुंजी आहे.
सरकारने जाहीर केलेली मदत वेळेवर पोहोचली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांचे संकट आणखी वाढेल.
शेतकऱ्यांना दिलासा, टोकाचे पाऊल उचलू नका
उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना म्हटले की, “शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, टोकाचे पाऊल उचलू नये. शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मी ही सर्व परिस्थिती शासनापर्यंत पोहोचवणार असून, कर्जमाफी आणि भरीव मदतीची मागणी लावून धरणार आहे.”
0 टिप्पण्या