Ticker

6/recent/ticker-posts

नगराध्यक्ष पदासाठी १६ उमेदवारांचे २४ अर्ज, तर सदस्य पदासाठी १५७ उमेदवारांचे तब्बल २४२ अर्ज दाखल

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी १६ उमेदवारांचे एकूण २४ अर्ज,तर सदस्य पदासाठी १५७ उमेदवारांचे तब्बल २४२ अर्ज दाखल झाले आहेत.या पार्श्वभूमीवर उद्या होणारी अर्जांची छाननी ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.कोणत्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरतात आणि कोणाचे अर्ज बाद होतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.


निवडणूक जाहीर झाल्यापासून तुळजापूर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी—शिवसेना, शिवसेना उबाठा गट,राष्ट्रवादी,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष,काँग्रेस,भाजप तसेच स्थानिक पातळीवरील गट-तटांनी—आपापल्या उमेदवारांना मोठ्या तयारीने मैदानात उतरवले आहे.अर्ज दाखल प्रक्रिया संपताच आता खरी परीक्षा उद्याच्या छाननीची आहे.


अर्ज छाननीनंतर कोणाचे अर्ज वैध ठरतात हे समोर आल्यानंतर पक्षांची पुढील रणनीती निश्चित होणार आहे.अनेक प्रभागांत एकाच पक्षातील अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने शहरातील राजकीय समीकरणेही बदलू शकतात.


अर्ज मागे घेण्यासाठी २१ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असणार आहे.तर अपील असणाऱ्या उमेदवारासाठी अर्ज मागे घेण्याची मुदत २५ नोव्हेंबर आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी मित्र—विरोधक,गट—तट,पक्षांतर आणि समन्वय यांची समीकरणे या दिवशी मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.


सायंकाळपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर खरी निवडणूक लढाई सुरू होईल आणि प्रचाराचा धुरळा उडेल अशी परिस्थिती आहे.


तुळजापूर नगरपरिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत असल्याने जनतेच्या अपेक्षा मोठ्या आहेत.शहरातील विविध पायाभूत सुविधा,विकासकामे,बाजारपेठेतील प्रश्न,वाहतूक व पाणीपुरवठा या मुद्द्यांवर नागरिकांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार याकडेही सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.


राजकीय वातावरण तापत असून,पक्षनिहाय ताकद,स्थानिक नेतृत्वाची पकड आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावर यंदाची निवडणूक अत्यंत रोचक होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या