Ticker

6/recent/ticker-posts

ऑनलाईन अडचणींमुळे निवडणूक आयोगाचा निर्णय — 15, 16 व 17 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज ऑनलाईनसोबत ऑफलाईनही स्वीकारले जाणार

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत ऑनलाईन प्रणालीमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारींचा विचार करून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे 15, 16 व 17 नोव्हेंबर या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीनेही स्वीकारले जाणार आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे अर्ज दाखल करण्यासाठी आतुर असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे.


तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे या पदासाठी कोण उतरणार, कोणत्या पक्षाकडून उमेदवार येणार, याबद्दल शहरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तसेच शहरातील काही प्रभागांमध्ये अद्याप एकही अर्ज दाखल न झाल्याने त्या प्रभागांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार, कोणत्या गटाची रणनीती काय असेल, याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.


ऑनलाईन पद्धतीतील सुरू असलेल्या त्रुटींमुळे उमेदवारांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची परवानगी मिळाल्यानंतर पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


निवडणूक आयोगाने रविवारची शासकीय सुट्टी असतानाही अर्ज स्वीकृती सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सलग तीन दिवस अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध असल्याने अनेक उमेदवारांनी तयारीला वेग दिला आहे.


आजपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक उमेदवारांनी कागदपत्रांची उणीव न राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव आणि पडताळणीचे काम सुरू केले आहे.


राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे तांत्रिक अडथळ्यांमुळे अडकलेली उमेदवारी प्रक्रिया पुन्हा गतीमान होण्याची चिन्हे आहेत. पुढील तीन दिवस तुळजापूरमध्ये निवडणूक वातावरण जोर धरताना पाहायला मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या