प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव :धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे 28 व 29 नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यामुळे जिल्ह्याच्या तसेच तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या राजकारणाला मोठे वळण मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यांच्या दौऱ्यात तीन महत्त्वपूर्ण जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
28 नोव्हेंबर रोजी उमरगा येथे सायं. 5 वाजता तर धाराशिव येथे रात्री 8 वाजता तर 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:45 वाजता कळंब येथे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होणार आहेत. या तिन्ही सभांमध्ये त्यांच्या समर्थित उमेदवारांच्या प्रचाराला वेग येणार आहे.
28 नोव्हेंबर रोजीच्या दोन सभांचे आयोजन पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री सरनाईक हे तुळजापूर येथील हॉटेल स्कायलँड येथे मुक्काम करणार आहेत. या मुक्कामादरम्यान तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या चर्चांना वेग येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी पाठिंब्याची घोषणा अद्याप झालेली नसल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने पाच उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. मात्र, नगराध्यक्ष पदासाठी कोणत्याही उमेदवाराला शिवसेनेने अद्याप अधिकृत पाठिंबा जाहीर केलेला नाही.यामुळे स्थानिक पातळीवर विविध चर्चा रंगत असून, समर्थक आणि स्थानिक नेतेही पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत.
दरम्यान,भाजपने तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत सर्व 23 जागांवर तसेच नगराध्यक्ष पदावर उमेदवार उभे केले असून प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. भाजप-शिवसेना हे या निवडणुकीत स्वबळावर मैदानात उतरले आहेत.
28 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक तुळजापूरमध्ये मुक्कामी असल्याने शिवसेना कोणत्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवणार याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे स्थानिक राजकारणात सरनाईक यांच्या भेटीला प्रचंड उत्सुकता लागली आहे.
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय परिस्थिती अधिकच रंगत चालली असून,पालकमंत्री सरनाईक यांच्या दौऱ्यामुळे राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने बदलतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.



0 टिप्पण्या