प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर तुळजापूरमध्येही निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असला, तरी तिसऱ्या दिवसअखेर (बुधवारपर्यंत) एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषद निवडणुकीत सुरुवातीला शांत वातावरण दिसत असले तरी, शेवटच्या काही दिवसांत राजकीय गती वाढण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असल्याने अनेक इच्छुक नेते, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार अद्याप पक्षाचा निर्णय व राजकीय समीकरणांची वाट पाहत असल्याचे बोलले जात आहे.
तुळजापूर नगरपरिषदेत ११ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागातून अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्जाचे फॉर्म विकत घेतले आहेत. त्यामुळे नेमके कोण अर्ज दाखल करणार आणि कोण मागे हटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्तरावर भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि काँग्रेस या पक्षांमध्ये उमेदवार निवडीसाठी आतून हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, शहरातील प्रमुख नेत्यांचे पॅनल निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू असून, काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी घराघरात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक कार्यालयात तुलनेने शांतता आहे.
आगामी काही दिवसांत राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार जाहीर होताच तुळजापूरमधील निवडणुकीची रंगत वाढणार आहे,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या विकास, पाणीपुरवठा,स्वच्छता,आणि मूलभूत सुविधांच्या मुद्यांवर यावेळी निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे.

0 टिप्पण्या