प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. यामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता सुलभ दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने यांनी दिलेल्या माहितीनुसार,दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1 वाजेपासून ते दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी खास मार्ग व्यवस्था लागू राहणार आहे.या कालावधीत सर्व भाविकांनी घाटशिळ रोड पार्किंग येथून प्रवेश करून बिडकर पायऱ्या मार्गे दर्शन मंडपात प्रवेश करावा लागणार आहे.
दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी तुळजापूरला हजेरी लावतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि भाविकांना सुलभ,सुरक्षित व सुरळीत दर्शन घडविणे हे मंदिर व्यवस्थापनासमोरील मोठे आव्हान असते. यंदाही यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याचे माया माने यांनी सांगितले.
तसेच सर्व महंत,पुजारी,सेवेदारी,स्थानिक कार्यकर्ते व भाविक भक्तांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही करण्यात आले आहे.
यंदाच्या नवरात्रात तुळजापूर नगरी पुन्हा एकदा "जय भवानी! जय शिवराय!!"च्या घोषणांनी दुमदुमणार असून भाविकांना सुरक्षित दर्शनासाठी ही विशेष व्यवस्था लाभदायक ठरणार आहे.
0 टिप्पण्या