प्रतिनिधी : मिलिंद भांगरे
आंबेगाव तालुका : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गंगापूर बुद्रुक येथील काळेवाडी परिसरात गेल्या आठवड्याभरापासून बिबट्याने अक्षरशः हौदोस घातला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे वारंवार हल्ले होत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर वन विभागाने तातडीने पिंजरा लावला आहे. मात्र, पिंजरा लावूनही बिबट्याने तो गुंगारा देत परिसरातील प्राण्यांवर हल्ला सुरूच ठेवला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची भीती आणखी वाढली आहे.
दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री दोन ते तीनच्या दरम्यान शेतकरी दयानंद धोंडीभाऊ डोंगरे यांच्या घराजवळील खुराड्यातील २१ कोंबड्यांपैकी तब्बल २० कोंबड्या बिबट्याने ठार केल्या. फक्त एकच कोंबडी जिवंत राहिली. त्याआधी दि. १५ सप्टेंबर रोजी शेतकरी भुषण सुरेश काळे यांच्या गोठ्यातील दोन वर्षांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला होता. उपचार सुरू असतानाच कालवड मृत्यूमुखी पडली. तसेच दि. १७ सप्टेंबर रोजी विजय शिवाजी काळे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले, तसेच त्या कुत्रीची चार ते पाच पिल्ले बिबट्याने ठार केल्याचे सांगण्यात आले.
या घटनांमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ रात्रीच्या वेळी शेतात पाणी सोडण्यासाठी जाण्यास किंवा मुलांना घराबाहेर सोडण्यासही घाबरत आहेत. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर, तसेच फसाबाई काळे व अनिल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी बिबट्याचे पायाचे ठसे ठिकठिकाणी आढळून आले आहेत.
ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठा अनर्थ होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
0 टिप्पण्या