Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर शहरात पार्किंगच्या नावाखाली लुटमार! — एकाच वाहनांकडून तिप्पट वसुलीचा प्रकार उघड

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर  — तुळजापूर शहरातील कमान वेस परिसरात पार्किंगच्या नावाखाली वाहनचालकांची उघडपणे लूट सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, एकाच वाहनाकडून तीन वेगवेगळ्या संस्थांच्या वतीने पार्किंगची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, संबंधित वाहनचालकांकडून नगरपरिषद, भाई उद्धवराव पार्किंग, आणि खासगी पार्किंग या तीनही नावांनी वेगवेगळे कर्मचारी पैसे वसूल करत आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.


या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना उपशहरप्रमुख रमेश चिवचिवे यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला असून, “तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,” असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.


शहरात वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पार्किंग व्यवस्थापन गरजेचे असले तरी ती सुसूत्र, पारदर्शक आणि कायदेशीर असावी, अशी नागरिकांची मागणी आहे. वाहनधारकांना तिप्पट भरणा करून गोंधळात टाकणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.


दरम्यान, नगरपरिषदेने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू करावी आणि संबंधित कंत्राटदार, खासगी संस्था यांची जवाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.


या प्रकरणात नगरपरिषदेची भूमिका काय राहते आणि दोषींवर कोणती कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या