Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा धक्का..! परंडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहूल मोटे यांचा राष्ट्रवादी (अजित पवार गटात) जाहीर प्रवेश

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार राहूल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असून, उद्या त्यांच्या पक्षप्रवेशाचा अधिकृत कार्यक्रम पार पडणार आहे.


राहूल मोटे हे परंडा तालुक्यातील प्रभावी आणि सक्रिय नेते म्हणून ओळखले जातात. मागील काही काळापासून ते पक्षांतर्गत नाराज होते, अशी चर्चा होती. अखेर त्यांनी शरद पवार गटाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. हा पक्षप्रवेश आगामी महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


विशेष म्हणजे, राहूल मोटे यांच्यासोबत तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांचे मोठे गटही राष्ट्रवादी (अजित पवार गटात) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा प्रवेश केवळ एक व्यक्तीपुरता मर्यादित न राहता एक मोठा राजकीय कलाटणी देणारा ठरण्याची शक्यता आहे.


या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते, कार्यकर्ते, अजित पवार गटाचे प्रदेशस्तरीय पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. यामुळे परंडा तालुक्यात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.


राहूल मोटे यांचा अजित पवार गटात प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी मोठा धक्का मानला जात असून, याचा थेट प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात धाराशिव जिल्ह्यात राजकीय घडामोडी अधिक रंगणार, यात शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या