प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : आगामी गणेशोत्सव, दसरा तसेच इतर धार्मिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन धाराशिव यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. सणासुदीच्या काळात विविध मंडळांकडून मांडव, प्रसाद व अन्नदान यांसारखे उपक्रम आयोजित केले जातात. त्यानिमित्त सर्व धार्मिक मंडळे, पदाधिकारी व प्रसाद उत्पादकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करून 100/- रुपये शुल्क भरल्यास नोंदणी करता येते. गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी ठेवावी, तसेच प्रमाणित परवानाधारक व्यावसायिकांकडूनच कच्चा माल खरेदी करावा, असेही प्रशासनाने सांगितले.
प्रसाद तयार करताना वापरलेले घटक ताजे, शुद्ध व स्वच्छ असावेत. उरलेला प्रसाद वापरण्याऐवजी सुरक्षितरीत्या विल्हेवाट लावावा, प्रसाद वितरण करणारे स्वयंसेवक आरोग्यदायी स्थितीत असावेत व आवश्यक ती स्वच्छता पाळावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सणासुदीच्या काळात स्वीट मार्ट, किराणा व्यापारी यांनीही आपल्या उत्पादनांची गुणवत्ता राखावी, विक्रीसाठी ठेवलेले साहित्य ताजे, शुद्ध व पॅकिंग नीटस असावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना अन्न पदार्थाबाबत काही तक्रार असल्यास ती तक्रार टोल फ्री क्र. 1800222365 किंवा ई-मेल acfcdadharashiv@gmail.com वर नोंदवण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) प्र.बा कुटे यांनी केले आहे.
गणेशोत्सव, दसरा सणांच्या काळात सुरक्षित, शुद्ध व आरोग्यदायी प्रसाद वितरण होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सर्व गणेश मंडळे, प्रसाद उत्पादक व व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करून स्वच्छता व गुणवत्तेवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या