Ticker

6/recent/ticker-posts

"मतदान चोर, खुर्ची सोड"च्या घोषणांदेत तुळजापूर शहरात महाविकास आघाडीची मशाल रॅली

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : सत्ताधारी भाजपाने मतचोरी करून सरकार स्थापन केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तुळजापूर शहरात आज (गुरुवार) दणदणीत मशाल महारॅली काढली. "मतदान चोर, खुर्ची सोड" अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.


छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भवानी रोड, आर्या चौक व कमान वेस परिसरातून निघालेल्या या मशाल महारॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. रॅलीदरम्यान घोषणाबाजी करून लोकशाही धोक्यात आणणाऱ्या मतदान चोरीच्या प्रकाराचा निषेध करण्यात आला.


रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी सांगितले की, मतदानाचा अधिकार हा गरीब-श्रीमंत सर्वांसाठी समान आहे. परंतु तो अधिकार आज लुटला जात असून लोकशाहीस तडा बसत आहे. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी जनतेनेच आवाज उठविणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले.


या आंदोलनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासमोर उपस्थित केलेला "मतदान चोरी" संदर्भातील प्रश्नही मांडण्यात आला. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आयोग देऊ न शकल्याने जनतेत जनजागृती व्हावी या हेतूने महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूरमध्ये मशाल महारॅली काढल्याचे आयोजकांनी सांगितले.


रॅलीनंतर उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रविण स्वामी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष रामदादा अलुरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, अमर चोपदार, तोफिक शेख, विवेक शिंदे, जनसेवक अमोल कुतवळ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्जुन साळुंके, भरत जाधव, कालिदास नाईकवाडी, नवनाथ जगताप, उत्तम अमृतराव, किरण खपले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या