प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, फरसाण, खाद्यतेल, तूप, रवा, बेसन, ड्रायफ्रुट, चॉकलेट आदी अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही व्यापारी व असामाजिक तत्वांकडून कमी दर्जाचे व भेसळयुक्त अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, धाराशिव कार्यालयामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत अन्न पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करणाऱ्या विविध पेढ्यांवर छापे टाकून तपासणी सुरू आहे. दरम्यान, गुप्तवार्ता विभागाच्या माहितीवरून ११ ऑगस्ट २०२५ रोजी लूज तेल व रियुज्ड टिन वापर प्रकरणी मोठी कार्यवाही करण्यात आली.
➡️ धाराशिव येथील मे. सिद्धेश्वर किराणा भांडार या पेढीतून २४३६ किलो (किंमत ₹३,८३,१३६/-) साठा जप्त.
➡️ मे. मदनलाल शामसुंदर बांगड, धाराशिव येथून ४३,३७७.६ किलो (किंमत ₹५९,३७,३८१/-) साठा जप्त.
➡️ कळंब येथील मार्केट यार्डात मे. बिरदीचंद हरकचंद बलई या पेढीतून १२४४ किलो (किंमत ₹१,७५,६४०/-) साठा जप्त.
➡️ उमरगा येथील मे. शुभम इंटरप्रायजेस येथून ६२८ किलो (किंमत ₹६७,१९६/-) साठा जप्त.
अशा प्रकारे एकूण ४७,६८५ किलो अन्नसाठा (किंमत ₹६५,५२,३५३/-) जप्त करण्यात आला आहे. यावेळी विविध पेढ्यांमधून १० अन्न नमुने घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदंड कायद्यान्वये पुढील कठोर कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागरिकांना भेसळमुक्त व दर्जेदार अन्न मिळावे, हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे नागरिकांनीही अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरुद्ध सतर्क राहावे, असे आवाहन धाराशिव अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न ) प्र.बा.कुटे यांनी केले आहे.
👉 तक्रारीसाठी संपर्क :
📞 टोल फ्री क्र. १८००२२२३६५
📧 ई-मेल : acfdadharashiv@gmail.com
0 टिप्पण्या