प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर: माहेरा अमीर शेख या पाच वर्षीय चिमुरडीने रमजान महिन्यातील पवित्र असा आपला पहिला रोजा अर्थात उपवास पुर्ण केला.
मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना दि. 02 मार्चपासून सुरू झाला आहे. या पवित्र रमजान रोजा अर्थात उपवासास धार्मिक महत्व असून मुस्लीम बांधवाकडून रोजाची कडक धारणा केली जाते. पहाटे सहेरी केल्यानंतर दिवसभर कांहीही न खाता व पाण्याचा एक थेंबही न पिता अल्लाहची आठवण करून रोजा पुर्ण केला जातो. या पवित्र रमजानच्या महिन्यात 30 दिवस अगदी धार्मिकतेने रोजा करतात. मुस्लीम धर्मामध्ये पाच तत्वापैकी रोजाला विशेष महत्व दिले जाते.
रमजानमध्ये रोजा या शब्दाला आरबी भाषेत सोम म्हणतात, याचा अर्थ थांबणे. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस ‘रोजा’ (उपवास) करणारे सर्व ‘रोजेदार’ दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत. यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची फार आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक शुचिभरूत वळण लाभतं. मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो. त्याचप्रमाणे ‘इबादत’ (उपासना) करण्यासाठीसुद्धा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते. संपूर्ण रमजान महिना हा जणू उपासनामय, प्रार्थनामय आणि भक्तिमय झालेला असतो.
कमान वेस, तुळजापूर येथील माहेरा अमीर शेख या 05 वर्षीय चिमुरडीने रमजान महिन्यातील पवित्र असा आपला पहिला रोजा अर्थात उपवास दि.16 रोजी पुर्ण केला. माहेरा ही तुळजापूर येथील जामा मस्जिद येथे रोजा (उपवास) सायं. 06.42 मिनीटांनी सोडला, त्यावेळी मुस्लिम बांधवांनी तिचे कौतुक केले.
माहेरा शेख ही जिजामाता प्राथमिक शाळा तुळजापूर येथे इयत्ता 1 ली च्या वर्गात शिक्षण घेत आहे.
सध्या कडक उन्हाळा आहे, अशा कडक उन्हाळ्यात देखील लहान वयातच माहेरा हिने रोजा धरून तो पुर्ण केल्याने शेख परिवारासह नातेवाईकांनी तिला पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या. तसेच नातेवाईकांनी तिचे कौतुक केले.
0 टिप्पण्या