Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात वाघाचा धुमाकूळ: सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांचे आंदोलन तीव्र होण्याच्या तयारीत



प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव:धाराशिव जिल्ह्यात तसेच बार्शी तालुक्यात मागील दोन ते तीन महिन्यांपासून वाघाने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कालावधीत वाघाच्या हल्ल्यात शेकडो जनावरे ठार झाली असून, नागरिक देखील दहशतीत जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाला सतर्क राहून वाघ पकडण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली. मात्र, वन विभागाने अद्यापही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असे सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी सांगितले आहे.

वन विभागाच्या निष्क्रीयतेचा निषेध म्हणून ‘गाढव भेट’ आंदोलन

वन विभागाच्या या अपयशाचा निषेध नोंदवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी विविध मार्गांनी आंदोलन केले. मात्र, तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे आता त्यांनी २० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गाढव भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाद्वारे वन विभागाच्या निष्क्रीयतेवर जोरदार हल्लाबोल करण्यात येणार असल्याचे मनोज जाधव यांनी जाहीर केले आहे.

वन विभागाचे हालचाली वाढल्या, आंदोलन रोखण्यासाठी प्रयत्न सुरू

या आंदोलनाची माहिती समजताच विभागीय वन अधिकारी आणि वन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे अशी माहीती समजत आहे. आंदोलनामुळे वन विभागाची प्रतिमा मलीन होण्याची भीती व्यक्त करत, जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून आंदोलन रोखावे, अशी विनंती वन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती मिळत आहे.

धाराशिवकरांचे आंदोलनाकडे लक्ष

आता जिल्हाधिकारी मध्यस्थी करून हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करणार का, की आंदोलन ठरल्याप्रमाणे पार पडणार, याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वन विभागाच्या भूमिकेबाबत अजून कोणतेही स्पष्ट संकेत मिळाले नसले, तरी मनोज जाधव हे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे.

वन विभागाने त्वरित कारवाई करून वाघ पकडण्याची ठोस रणनीती आखली नाही, तर येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि वन विभाग कसे पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या