प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील तालुका वाईज शिवसेना भवन येथे कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक रणनीती, उमेदवार निवड आणि पक्ष संघटन बळकटीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीसाठी तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व पदाधिकारी युवासेना,महिला आघाडी तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे मत जाणून घेण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की,“शिवसेना पक्ष आगामी निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार तुळजापूर तालुक्यातील सर्व ठिकाणी शिवसेना उमेदवार देणार असून, आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, येणाऱ्या काळात महायुतीमध्ये युती होणार का नाही, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. तथापि, सर्व पक्षांनी जर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, तर तुळजापूर तालुक्यात शिवसेनेचे उमेदवार सर्वच ठिकाणी मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आणि गावागावात शिवसेनेचा झेंडा अधिक बळकटपणे फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.
सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना कोणत्या मार्गाने जाणार आणि पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार, याकडे केवळ तुळजापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या