Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर; राजकारणात रंगत वाढली!

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळजापूर नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून हे पद यंदा सर्वसामान्य वर्गासाठी राखीव ठरले आहे. या आरक्षण घोषणेनंतर तुळजापूरच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली असून विविध पक्षांतील दिग्गजांनी आपापले मोर्चे बांधण्यास सुरुवात केली आहे.


काल आरक्षण जाहीर होताच शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपापल्या संभाव्य उमेदवारांचे समर्थन करणारे स्टेटस ठेवत उत्साह व्यक्त केला आहे. काहींनी तर थेट स्वतः नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे.


यामध्ये विनोद (पिंटू) गंगणे,अमोल कुतवळ,ऋषिकेश मगर,कृष्णा रोचकरी,श्रीकृष्ण उर्फ बबलू सूर्यवंशी,सुनिल पिंटू रोचकरी,प्रशांत कदम सोंजी आदी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत.या सर्वांनी आरक्षण जाहीर होताच आपली इच्छुकता जाहीर केल्याने आगामी निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


दरम्यान, काही प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपले अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे पुढील काही दिवसांत पक्षीय बैठका,राजकीय समीकरणे आणि नव्या संधींमुळे तुळजापूरचे राजकारण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


शहरातील जनतेचेही आता लक्ष या आगामी निवडणुकीकडे लागले आहे. तुळजाभवानीच्या नगरीत कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडते,हे पाहण्यासाठी सर्व नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या