Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूरातील ऐतिहासिक भगवती विहीरीची स्वच्छता मोहिम — भगवती ग्रुपचा पुढाकार,नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनानंतरही दखल न घेतल्याने स्वखर्चाने सुरू केले काम!

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळजापूर शहरातील निजामकालीन व अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात बांधलेली ऐतिहासिक भगवती विहीर ही शहराच्या वारशाचे प्रतीक मानली जाते.मात्र गेल्या काही वर्षांपासून या विहिरीकडे दुर्लक्ष झाल्याने ती पूर्णपणे अस्वच्छ झाली होती.विहिरीत कचरा,गाळ,आणि प्लास्टिकचा साठा झाल्यामुळे तिचे सौंदर्य हरवले होते.


या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूर भगवती ग्रुपच्या वतीने काही दिवसांपूर्वी नगरपरिषद तुळजापूर यांना निवेदन देण्यात आले होते.विहीर त्वरित स्वच्छ करून तिचे जतन करावे,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती. मात्र नगरपरिषदेने त्याकडे कोणतीही दखल न घेतल्याने अखेर भगवती ग्रुपने स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने विहीर स्वच्छ करण्याचे ठरवले.


आजपासून या स्वच्छता मोहिमेला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला असून,ग्रुपचे अध्यक्ष दुर्गादास कदम यांच्या नेतृत्वाखाली हणमंत निकम, विजय कदम,शंभू ढाले,अर्जुन परदेशी,संभाजी चोपदार,राहुल चिवचिवे तसेच सर्व सदस्य या मोहिमेत सहभागी झाले आहेत. सकाळपासूनच विहिरीतून कचरा,प्लास्टिक व गाळ काढण्याचे काम सुरू असून,विहीर पुन्हा एकदा स्वच्छ,सुंदर आणि आकर्षक करण्यासाठी सदस्यांकडून परिश्रम घेतले जात आहेत.


या उपक्रमामुळे भगवती ग्रुपच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकीचा आदर्श पुढे ठेवला असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेत सहकार्याची तयारी दर्शवली आहे.


तुळजापूरातील ही ऐतिहासिक भगवती विहीर स्वच्छ झाल्यानंतर पर्यटनदृष्ट्याही तिला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


“नगरपरिषदेने दुर्लक्ष केले, पण आम्ही आमचा वारसा वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. भगवती विहीर ही आपल्या शहराची ओळख आहे, तिचे संवर्धन आपले कर्तव्य आहे,”

— दुर्गादास कदम, अध्यक्ष, भगवती ग्रुप तुळजापूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या