Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यासाठी कार्डियक ॲम्बुलन्स मिळणार — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन

 


प्रतिनिधी : जुबेर शेख

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यासाठी आणखी एक कार्डियक ॲम्बुलन्स मंजूर करण्याची मागणी तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापरावजी सरनाईक यांच्याकडे केली आहे. या मागणीची तात्काळ दखल घेत सरनाईक साहेबांनी “तालुक्यातील भाविक व नागरिकांच्या सेवेसाठी लवकरच एक कार्डियक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात येईल” असे आश्वासन दिले आहे.


दररोज हजारो भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर शहरात येतात. या भाविकांपैकी काहींना अचानक आजारपण, अपघात किंवा हृदयविकाराचा झटका आल्यास त्यांच्यासाठी फक्त एकच कार्डियक ॲम्बुलन्स उपलब्ध आहे. तसेच तालुक्यातील रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी धाराशिव,सोलापूर किंवा पुणे येथे नेण्याची वेळ येते. या एकमेव अॅम्ब्युलन्सवर ताण वाढल्याने अनेकांना खाजगी ॲम्बुलन्सचा अवलंब करावा लागतो, ज्यासाठी ८ ते १० हजार रुपये भाडे आकारले जाते. त्यामुळे गोरगरीब रुग्णांवर आर्थिक ओझे येत आहे.


ही परिस्थिती लक्षात घेऊन तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी पालकमंत्री सरनाईक यांना लेखी निवेदन सादर केले.यात तुळजापूर तालुक्यासाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून किंवा सामाजिक संस्थेमार्फत एक नवीन कार्डियक ॲम्बुलन्स मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील आठ ते दहा दिवसांत ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील नागरिक, भाविक आणि रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


तुळजापूर तालुका हा धार्मिकदृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने, येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी व आरोग्याच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत गरजेची असल्याचे स्थानिकांनी नमूद केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या