प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : जिल्ह्यातील पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता स्थानिक राजकारणाला वेग आला आहे. विशेषतः चिखली पंचायत समिती या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून मराठा सेवक तथा समाजसेवक मनोज जाधव रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मनोज जाधव यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचे संकेत दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून विविध पक्षांच्या नेत्यांनी आपल्या गणिताचा फेरविचार सुरू केल्याचे दिसत आहे.
मनोज जाधव हे गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय भूमिका बजावत आहेत. जिल्ह्यातील विविध आंदोलनांमध्ये त्यांनी केवळ नेतृत्वच केले नाही तर संघर्षशील आणि जनतेशी जोडलेला चेहरा म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. याशिवाय, रुग्णसेवा व समाजसेवा क्षेत्रात त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. सामाजिक आणि मानवी सेवेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.
चिखली परिसरात मनोज जाधव यांचा चांगला जनसंपर्क असून, त्यांच्या अपक्ष उमेदवारीच्या शक्यतेने अनेक पक्षांच्या नेत्यांचे समीकरण बिघडण्याची चिन्हे आहेत. ग्रामपातळीपासून ते तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये “मनोज जाधव नक्कीच रिंगणात उतरणार” अशी चर्चा रंगली आहे.
पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होतील. मात्र, सध्या तरी मनोज जाधव यांच्या या निर्णयाने चिखली पंचायत समितीचा राजकीय तापमान वाढलेले दिसत आहे.
“जनतेची सेवा हाच माझा धर्म आहे” असे नेहमी सांगणारे मनोज जाधव आता अपक्ष उमेदवार म्हणून जनतेचा विश्वास जिंकतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

0 टिप्पण्या