प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.आरक्षण जाहीर होताच अनेक दिग्गजांनी नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली असून काहींनी माध्यमांसमोर थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचेही स्पष्ट केले आहे.
गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषदेत प्रशासकीय कारभार सुरू होता. आता निवडणुकीची घोषणा होण्याच्या प्रतिक्षेत असलेले नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुढील काही दिवसांत निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान,या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडते,हे पाहण्यासाठी संपूर्ण तुळजापूर शहराचे लक्ष लागले आहे. शहरातील विविध राजकीय गट,स्थानिक संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये हालचालींना वेग आला असून प्रत्येक उमेदवाराने आपापल्या कार्यकर्त्यांची बैठक,रणनीती आखणी आणि मतदार संपर्क मोहीम सुरू केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत तरुण मतदार निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे मानले जात आहे.यावेळेस नवीन मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाल्याने पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांचा झुकाव कोणत्या उमेदवाराकडे राहतो,यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहू शकतो.
दरम्यान,काही वरिष्ठ राजकीय नेत्यांनी ही निवडणूक सोपी नसल्याचे संकेत दिले आहेत.दीर्घ काळानंतर होणारी ही नगरपालिका निवडणूक सर्वच पक्षांसाठी आणि उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.मतदारांच्या अपेक्षा,शहरातील विकास प्रश्न,पाणीपुरवठारस्त्यांची दुरवस्था,स्वच्छता यासारखे मुद्दे या निवडणुकीत मुख्य ठरण्याची शक्यता आहे.
आगामी काही दिवसांत प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल आणि कोणत्या उमेदवाराला जनता नगराध्यक्षपदाच्या गादीवर बसवते,याकडे संपूर्ण तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या