प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : मराठा आरक्षण चळवळीचे अग्रणी नेते मनोज जरांगे पाटील यांचा उद्या (५ ऑगस्ट) धाराशिव जिल्ह्याचा दौरा निश्चित झाला असून, या दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या दौऱ्यादरम्यान, मनोज जरांगे पाटील हे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या चवडी बैठकी संदर्भातील संपूर्ण माहितीचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीमधून शासनाच्या धोरणांबाबत जनतेत असलेली भावना, मराठा समाजाच्या अपेक्षा आणि मागण्या यांचा सखोल अभ्यास ते करणार आहेत.
दौऱ्याचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक. या बैठकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील मराठा नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात येणार असून, आंदोलनाचे पुढील दिशा व कृती आराखडा यावर मार्गदर्शन करण्यात येईल.
मनोज जरांगे पाटील यांचे आगमन उद्या सकाळी १० वाजता धाराशिवमध्ये होणार आहे. आगमनानंतर ते विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने बैठकांचे आयोजन करणार असून, त्या बैठकीत मराठा आरक्षणासंबंधित प्रश्न, सरकारी निर्णयांची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षणातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
विशेष म्हणजे, मनोज जरांगे पाटील धाराशिव जिल्ह्यात मुक्कामी राहणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील मराठा समाजाच्या भावना थेट त्यांच्या पर्यंत पोहोचण्यास संधी मिळणार आहे.
मराठा समाजाच्या हक्कासाठी सुरु असलेली ही चळवळ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, धाराशिव जिल्ह्यातील दौऱ्यामधून त्याला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 टिप्पण्या