Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यात वाघाचा पुनरागमन?, शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : सहा-सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यात वाघाची एन्ट्री झाल्याची घटना समोर आली आहे. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारात वाघाने गुरांच्या वासरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या वेळी शेतकऱ्यांनी जवळपास शंभर फुटांवरून वाघ प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले. प्रथमदर्शीय शेतकऱ्याचे बोलतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.


वन विभागासाठी ही घटना पुन्हा डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत वाघाने फक्त जनावरांवर हल्ला केला असला तरी माणसावरही हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तुळजापूर तालुक्यात वाघाचे वावर असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर या घटनेने त्या बातम्यांना दुजोरा मिळाला आहे. लाखो-करोडो रुपये खर्च करून वाघ संरक्षण व व्यवस्थापनासाठी प्रशासन काम करत असले तरी वाघ पुन्हा सक्रिय झाल्याने या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


सिंदफळ परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण असून शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास घाबरत आहेत. “वाघावर किंवा बिबट्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाने तातडीने पिंजरे लावावेत, तसेच गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके नियुक्त करावीत,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


वन विभागाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली तरी, स्थानिक प्रशासन तातडीने उपाययोजना हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या